जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील सुवर्णनगरीत यंदाच्या दिवाळीपूर्वी सोने आणि चांदी दरवाढीचा कहर दिसून आला. दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठल्याने ग्राहकांना मोठी झळ बसली. मात्र सोन्या-चांदीच्या घोडदौडीला ऐन दिवाळीत ब्रेक लागल्याने वसुबारसनंतरच्या सात दिवसांत सोने ८२३६ रुपये तर चांदी २३,६९० रुपयांनी घसरली.

दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात होईल. यामुळे वधू-वरांकडून सोने-चांदी खरेदी केली जाते. त्यापूर्वी उच्चांकापासून दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला. यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीपासून सोने-चांदीत घसरण सुरू झाली. शुक्रवार, २४ ऑक्टोबरपर्यंतच्या सात दिवसांत सोने ८२३६ रुपयांनी घसरुन १,२६,९०० रुपये तोळा तर चांदी २३,६९० रुपयांनी घसरून १,५६,५६० रुपयांवर स्थिरावली.

१ ऑक्टोबरला सोने १,२१,७४६ रुपये तोळा तर चांदीचे प्रतिकिलोचे दर १,५३,४७० रुपये होते. वसुबारसला गेल्या शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) सोने सर्वकालीन उच्चांकी १,३५,१३६ रुपयांवर पोहोचले. ऑक्टोबरच्या १७ दिवसांत ते १३,३९० नी महागले, तर बुधवारी (१५ ऑक्टोबर) चांदीने सोन्याला मागे टाकून १,९०,५५० रुपये किलो दराचा विक्रमी टप्पा गाठला. अर्थात १५ दिवसांत चांदी ३७,०८० रुपयांनी महाग झाली होती.
घसरणीमागचे कारण काय?
पुढील १५ दिवसांत डोनाल्ड ट्रम्प हे चीन दौऱ्यावर जाणार आहेत. यात ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर टेरिफ वॉर संपुष्टात येण्याचे वृत्त आले आणि वायदा बाजारात नफा बुकिंग सुरू झाली. त्यामुळे मोठी घसरण होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.












