जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२६ । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गुढीपाडव्यानंतर वाढलेल्या दरांनंतर अचानक दोन्ही धातूंमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीला वेग आला आहे

घसरणीचे नेमकं कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, आताच्या या दर घसरणीमागे तीन प्रमुख कारणे आहेत. वाढती महागाई सर्वात मोठी चिंता ठरली असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांच्या कठोर आर्थिक धोरणांमुळे सोन्यासारख्या धातुंवरील आकर्षण कमी होत आहे. याशिवाय जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने महागाईचा दबाव कायम आहे.

काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोने दरात प्रति तोळा ३८११ रुपयांची घट नोंदवली. त्यामुळे या सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ४८ हजार ६२९ रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी काल शुक्रवारी सोन्यात १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ४४० रुपयांपर्यंत पोहचले होते.
चांदीचा दर
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झालीय. आज शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ७२१० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ३७ हजार ९३० रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी काल शुक्रवारी दिवसभरात चांदीत ६१८० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसही प्रति किलो दोन लाख ४५ हजार १४० रुपयांपर्यंत पोहचले होते










