जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे सणासुदीचा काळ सुरु असताना गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. सततच्या वाढीनंतर दोन्ही धातूंच्या किमतींनी ऐतिहासिक पातळी गाठलीय. दरम्यान यात चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतच असून मागच्या दोन दिवसात चांदी दरात तब्बल १४ हजाराहून अधिकची वाढ झालीय.

जळगावमध्ये शुक्रवारी चांदी दरात प्रति किलो तीन हजार रुपयांची वाढ होऊन ती १ लाख ६७ हजार अशा उच्चांकीवर पोहोचली. ९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात झालेली ११ हजार २०० रुपयांची वाढ व १० रोजी पुन्हा झालेली वाढ पाहता दोन दिवसांत चांदीचे भाव १४ हजार २०० रुपयांनी वधारले आहेत.

९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात ११ हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख ६४ हजार रुपयांवर पोहोचले. १० ऑक्टोबर रोजी चांदीत पुन्हा तीन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६७ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. एक किलो चांदीसाठी जीएसटीसह आता एक लाख ७२ हजार १० रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीची आयात कमी होत असल्याने देशात तिचा तुटवडा जाणवत आहे.
दुसरीकडे शुक्रवारी सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. ९ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २३ हजार ६०० रुपयांवर पोहोचले होते. १० ऑक्टोबर रोजी मात्र पुन्हा एक हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.










