जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळत असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे सोन्याने विनाजीएसटी पुन्हा एक लाखाचा टप्पा पार केला आहे. सोन्यापाठोपाठ चांदी दरातही वाढ झाली आहे. विशेष रक्षाबंधन सारख्या खास सणांपूर्वीच सोने-चांदीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोने दरात १७०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख २०० (जीएसटीसह १०३८२४) रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले. त्याचवेळी २२ कॅरेट सोन्याचा दर ९३७०० रुपये प्रति तोळा इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर ७८६०० रुपये इतका आहे.

दुसरीकडे चांदी दरात सोमवारी १००० रुपयांची वाढ दिसून आली. यामुळे चांदीचा दर आता विनाजीएसटी ११३००० रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान सणासुदीपूर्वी मौल्यवान धातूत दरवाढ होते हे समीकरण ठरलेले आहे. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. त्याचा फायदा बाजारपेठेला होतो. आता रक्षाबंधनापूर्वीच सोन्याचा तोरा वाढला आहे. तर चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या वर गेला आहे. गेल्या महिन्यात २३ जुलै रोजी सोने १ लाख ८०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी १ हजार ७०० रुपयांची घसरण होऊन ते ९९ हजार १०० रुपयांवर आले होते.
दरम्यान, ऑगस्ट सुवर्ण बाजारात मंदीचा काळ मानलो जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने भावात फारशी मोठी वाढ नव्हती. मात्र अमेरिकेन टॅरिफचे सावट असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.










