जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत असून दोन्ही धातूंच्या किमतींनी नवा उच्चांकी दर गाठला. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. पण आज 22 मे रोजी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोने 800 रुपयांनी घसरले. पण चांदीत पुन्हा वाढ झाली आहे.
सोने चांदीच्या दरात चढ उतार सुरूच आहे. अक्षय तृतीयेनंतर मौल्यवान धातूंनी मोठी भरारी घेतली आहे. गेल्या सात दिवसात चांदीच्या दरात तब्बल 7000 ते 7500 रुपयांची वाढ झालेली दिसून येतेय. गेल्या बुधवारी जळगावात चांदीचा एक किलोचा भाव 85000 रुपयावर होता. दुसरीकडे सोन्याचा दर 73 हजाराखाली होता. सोने देखील 1500 रुपयापर्यंत वधारले आहेत. आज मात्र सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र चांदीत वाढ सुरूच आहे.
आता काय आहे सोने चांदीचा दर?
जळगावच्या सराफ बाजारात सोने 800 रुपयांनी घसरले, तर चांदी 300 रुपयांनी वधारली. या घसरणीमुळे आता सोन्याचे दर विनाजीएसटी 74 हजार 300 रुपये तोळ्यावर आले. जीएसटीसह सोन्याचा दर 76,530 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी 300 रुपयांची वाढ होऊन ती विनाजीएसटी 92 हजार 800 रुपये प्रति किलोवर पोहोचली. जीएसटीसह चांदीचा प्रति किलोचा दर 95,584 रुपयांवर विकली जात आहे.