जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या भावात मागच्या १० दिवसात मोठी घसरण झालीय. सोबत चांदीचा भाव देखील घसरला आहे. परंतु सोने दरात घसरण झाली असली तरी अद्याप एक तोळा सोन्याचा भाव एक लाखाच्या वर विकला जात आहे.

जळगावमध्ये रक्षाबंधनापूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आज मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार २७९ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात तब्बल २२६६ रूपयांची घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. सोन्यात अलिकडच्या काळात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळत असले, तरी त्याचे दर अजुनही एक लाखांवरच आहेत. त्यामुळेही ग्राहकांनी सोने खरेदीसाठी थोडा हात आखडता गेल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.

चांदीच्या दरात १०३० रूपये घट
जळगावमध्ये रक्षा बंधनापूर्वी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्या तुलनेत मंगळवारी १०३० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत खाली आले. परिणामी, ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला.












