
जळगाव लाईव्ह न्यूज । ग्रामीण भागातील चिमुकल्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात आणि अंगणवाड्यांचे रूप पालटावे, या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून तसेच जिल्ह्यातील मंत्री व आमदारांच्या सहकार्यानेजिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाला चालना मिळत आहे. महिला व बालविकास विभागाच्या २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयासोबत प्रसिद्ध झालेल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील १३८ अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धरणगाव तालुक्यातील १४ आणि जळगाव तालुक्यातील ७ अंगणवाड्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्यातील ३ हजार ८३२ अंगणवाड्यांसाठी ६३ कोटी ५ लाख ९३ हजार ९२० रुपये खर्चाच्या स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस मान्यता दिली आहे. प्रति अंगणवाडी एक लाख ६४ हजार ५६० रुपये किमतीचा संच उपलब्ध होणार आहे. शासन निर्णयाच्या परिशिष्टात राज्यातील १ हजार ६८७ अंगणवाड्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३८ अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.
धरणगाव व जळगाव तालुक्यातील या अंगणवाड्यांचा समावेश
धरणगाव तालुका – १४ अंगणवाड्या : बोरखेडा, दोनगाव बु., नांदेड, नरणे, सार्वे, टहाकळी, भोद खु., हिंगोणे बु., पिंप्री खु., झुरखेडा, अनोरे, बांभोरी बु., सोनवद बु. आणि वाघळूद खु.
जळगाव तालुका – ७ अंगणवाड्या : भादली बु., कडगाव, कुंसुबे खु., वराड, वसंतवाडी, विटनेर आणि कंडारी.
जिल्ह्यातील तालुकानिहाय अंगणवाड्या
या यादीत भुसावळ तालुक्यातील ३४, अमळनेर २९, चोपडा २०, धरणगाव १४, मुक्ताईनगर १४, यावल ८, जळगाव ७, रावेर ७, एरंडोल ३ आणि बोदवड तालुक्यातील २ अशा एकूण १३८ अंगणवाड्यांचा समावेश आहे.
स्मार्ट अंगणवाडी संकल्पनेतून बालकांना ई-लर्निंगची साधने, आधुनिक शैक्षणिक साहित्य, स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला नवी दिशा मिळण्यास मदत होईल.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध सुविधांना प्राधान्य दिले आहे. या उपक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांचे सहकार्य लाभत आहे.
उर्वरित अंगणवाड्यांनाही संधी
राज्यातील उर्वरित २ हजार १४५ स्मार्ट अंगणवाडी किटचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्याचे अधिकार एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वाटपात जिल्ह्यातील आणखी अंगणवाड्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.





