
जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर ते घोडसगाव रोडवर इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांनी दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या वडिलांना अडवून मारहाण करत तब्बल पाच लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री विश्रांती हॉटेलसमोर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुक्ताईनगर पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील सुविधा रेसिडेन्सीमध्ये राहणारे यश लक्ष्मीकांत जोशी (वय २३) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या वडिलांना घोडसगाव शिवारात पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून (एमएच १२ पीक्यू ३९५६) आलेल्या चौघांनी लक्ष्य केले. संशयितांनी दुचाकीला मागून कट मारून खाली पाडले. त्यानंतर कारमधून उतरलेल्या चौघांनी त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील पाच लाख रुपये रोख असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. रोकड लुटल्यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेप्रकरणी प्रसाद शिवदास बोंडे (रा. आमदगाव, ता. बोदवड), गौरव सुधीर राजपूत, विक्की ईश्वर गुरचळ आणि निलेश ईश्वर गुरचळ (तिघे रा. नाडगाव, ता. बोदवड) यांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत. या संशयितांविरुद्ध यापूर्वी बोदवड आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांत खुनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील आणि पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रिय झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ करीत आहेत.




