जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२५ । सोने चांदी दरात सुरु असलेली चढ उतार कायम असून मंगळवारी घसरण झालेल्या सोन्यासह चांदी दरात वाढ झालीय. विशेष आज जळगावच्या सुवर्णपेठेत बुधवारी सकाळी बाजार उघडताच चांदीने मागील उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. ज्यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे चांदीचे दर वाढत आहेत. बाजारात चांदीची मागणी जास्त आणि कमी पुरवठ्यामुळे किंमती वाढत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सोलर पॅनेलमध्येही चांदीचा वापर केला जात आहे, ज्यामुळे मागणीत सातत्याने वाढ नोंदवली गेली. आज बुधवारी सकाळी चांदीने नवीन उच्चांक गाठला आहे.

आज सकाळच्या सत्रात जळगाव सराफ बाजारात चांदीत तब्बल ८२४० रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९३ हजार ६४० रूपयांपर्यंत महागली. जळगावमध्ये चांदीने दिवाळीच्या आधी १५ ऑक्टोबरला एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा उच्चांकी दर गाठला होता. मात्र, आता चांदीने मागील उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवीन उच्चांक प्रस्थापित केल्याने खळबळ उडाली आहे.
सोन्याचा दर
दुसरीकडे आज सोने दरात १०३ रूपयांची किंचित वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर एक लाख ३२ हजार ०४६ रूपयांवर पोहोचले.












