जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. नुकताच त्याचा एक टप्पा म्हणून गट आणि गणांचे आरक्षण सुद्धा जाहीर झाले. कुऱ्हे, वराडसीम, सुनसगाव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून या गटातून सुनसगाव येथील आदर्श शिक्षक अनिल ठाकूर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
जि.प. निवडणुकीच्या गट आरक्षणांनी अनेकांना धक्का दिला तर अनेकांना सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे. भुसावळ तालुक्यातील एक महत्त्वाचा गट म्हणून ओळखला जाणाऱ्या कुऱ्हे प्र.न. – वराडसीम – सुनसगाव गट हा अनुसूचित जमाती (एसटी) करता राखीव झाला आहे. या गटातील सुनसगाव गावाचे रहिवासी तथा माध्यमिक शिक्षक अनिल ठाकूर यांचे नाव चर्चेत आले आहे. या गटातून आत्तापर्यंत विश्वनाथ पाटील, पल्लवी सावकारे यासारख्या अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केल्याने या गटाला जिल्हा परिषदेत एक महत्त्वाची ओळख आहे.
दरम्यान, ठाकूर यांचा परिवार सुनसगाव येथील शिक्षित सुसंस्कृत व सामाजिक उपक्रमात भाग घेणारा परिवार आहे. समाजासाठी नेहमी योगदान देणाऱ्या या परिवारातील आदर्श शिक्षक अनिल ठाकूर यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. ठाकूर यांच्या निमित्ताने सुनसगाव गावाला प्रथमच जिल्हा परिषद सदस्यासाठी एक उत्तम संधी चालून आल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. अनिल ठाकूर हे काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक असून त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. आदिवासी मित्र पुरस्कार, बियाणी संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य तसेच दैनिक गावकरीचे प्रतिनिधी देखील आहे. ठाकूर यांच्या नावाची चर्चा असली तरी येत्या काळात कुठला पक्ष, काय भूमिका घेतो? यावर आगामी चित्र अधिक स्पष्ट होईल.