जळगाववर दुष्काळाचे गडद सावट ; जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये, पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज काय?

ऑगस्ट 6, 2025 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । यंदा वेळेआधी दाखल झालेला मान्सून पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी चांगली हजेरी लावली. मात्र काही ठिकाणी पावसानं अद्यापही समाधानकारक हजेरी न वाल्याने चिंता वाढली. सध्या पावसाने उघडदीप दिल्याने शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यातच भारतीय हवामान विभागाकडून कमी पावसाचे जिल्हे काढण्यात आले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे.

grip of drought

यंदा जळगाव जिल्ह्याच्या ८६ महसूल मंडळांपैकी तब्बल २२ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. केवळ १३ महसूल मंडळांमध्ये पावसाने शंभरी गाठली आहे. पावसाच्या तीव्र तुटीमुळे जळगाव जिल्हा ‘रेड झोन’मध्ये समाविष्ट झाला आहे, ज्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे.

पावसाची अशी स्थिती

१०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके – भडगाव, चाळीसगाव
७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके – भुसावळ, पारोळा, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा, बोदवड
५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके – जामनेर, जळगाव
५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेले तालुके – यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, धरणगाव.
मारवड महसूल मंडळात तब्बल ७८ टक्के पावसाची तूट आहे. रावेर, यावल, अमळनेर, चोपडा, धरणगाव हे पाच तालुके सद्यःस्थितीत डेंजर झोनमध्ये.

पावसाबाबत हवामानाचा अंदाज काय?

सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतला असून दुसरीकडे तापमानात वाढ झाली. जळगावचे तापमान ३४ अंशावर पोहोचले असून यामुळे उकाड्यासोबतच उन्हाचे चटके वाढून श्रावणात वैशाख वणव्याची अनुभूती येत आहे. पावसाअभावी खरीप पिके करपू लागली असून यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पावसाचे कधी पुनरागमन होणार याकडे शेतकरी वर्ग प्रतीक्षेत आहे. अशातच हवामानाच्या अंदाजानुसार अजून आठवडाभर पावसाची शक्यता कमीच आहे. १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस जोरदार राहील की, तुरळक याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही.

दरम्यान यंदाही गेल्या काही वर्षांचा पावसाचा पॅटर्न पाहिला तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. मात्र, हा पाऊस खरीप पिकांसाठी धोकेदायक ठरतो, यंदाही सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला तर आधीच कमी पावसामुळे पिकांची स्थिती खराब होत आहे. त्यात ऐन काढणीवर जोरदार पाऊस झाला, तर ५० टक्केही हंगाम येणे कठीण आहे.

चकवा की काय, जिल्ह्यात पावसाची तूट २९ टक्क्यांपर्यंत…

जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत ३४४ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र, यंदा केवळ २४७मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४३२ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात यंदाच्या सरासरीप्रमाणे केवळ ७१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्यातरी २९ टक्के पावसाची तूट आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now