चोपड्यात खतांची आंतरराज्य तस्करी उधळली; ६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मे 5, 2026 6:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांची बेकायदेशीर वाहतूक करून शेजारच्या राज्यात तस्करी करण्याचा एक मोठा प्रयत्न प्रशासनाने उधळून लावला आहे. जिल्हास्तरीय कृषी भरारी पथक आणि चोपडा ग्रामीण पोलिसांनी सीमावर्ती भागात संयुक्त कारवाई करत सुमारे ६ लाख ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे खतांचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

khat

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याला एका गोपनीय माहितीदाराकडून बातमी मिळाली होती की, अनुदानित युरिया व इतर रासायनिक खतांची अनधिकृत मार्गाने वाहतूक करून ती शेजारच्या राज्यात (मध्य प्रदेश) विक्रीसाठी पाठवली जाणार आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी सीमावर्ती वैजापूर परिसरात सापळा रचला.

या दरम्यान एक नंबर नसलेली ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर संशयास्पद स्थितीत येताना दिसला. पथकाने वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अनुदानित खते साठवलेली आढळून आली. सुरुवातीला ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. मात्र, पथकाने अधिक पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर, ही खते चोपडा शहरातील ‘माऊली ट्रेडर्स’ या खत विक्री केंद्रातून कोणतीही अधिकृत पक्की पावती (बिल) न घेता भरून देण्यात आल्याची कबुली चालकाने दिली. खतांची वाहतूक करताना कोणतेही वैध कागदपत्र किंवा पास त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता.

या कारवाईत १९,९५० रुपये किंमतीच्या ७५ बॅग युरिया, १३,००० रुपये किमतीचे २० बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, ६,७५० रुपये किमतीचे पाच बॅग डीएपी, २१,१५० रुपये किमतीच्या ९ बॅग २०:२०:०:१३ तसेच १८०० रुपये किमतीच्या आठ नॅनो युरियाच्या बाटल्या, असा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय सुमारे ५ लाख ८० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीही जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६.३३ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या खतांची वाहतूक करताना कोणतेही वैध कागदपत्र किंवा अधिकृत बिल उपलब्ध नव्हते.

या प्रकरणी माऊली ट्रेडर्सचे संचालक विवेक राजाराम पाटील (रा. चोपडा) तसेच सरद सीताराम पीपलदे (रा. सातपाटी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध जिल्हा भरारी पथकाचे अध्यक्ष व मोहीम अधिकारी अविनाश खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि कृषी विभाग संयुक्तपणे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now