जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ पारोळा पोलीस ठाणे आणि पाळधी महामार्ग पोलीस केंद्राच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान एका संशयास्पद कारची तपासणी करण्यात आली. या कारवाईत वाहनांमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंची चोरी आणि अवैध व्यापार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे कारवाई?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवे गावाजवळ नाकाबंदी सुरू असताना DL-3-CBU-3358 क्रमांकाची निळ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनार संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) हे आढळून आले.

वाहनाची झडती घेतली असता जुने वापरलेले ईको वाहनांचे तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच त्यामधील अंदाजे ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर असा मुद्देमाल आढळून आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत संशयितांकडून मारुती सुझुकी ईको वाहनांमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या पद्धतीने काढून त्यातील मौल्यवान घटकांची विक्री अथवा अवैध व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती चौकशीत समोर आली असून, त्यांच्याविरुद्ध तेथे गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी सुरू आहे.
कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या आतील भागात मधमाशांच्या पोळ्यासारखी हनीकॉम्ब रचना असते. त्यावर प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर केला जातो. या धातूंना बाजारात मोठी किंमत असल्याने कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे प्रकार वाढत असल्याचे समोर येत आहे.
ईको वाहनांना लक्ष्य का? याबाबतच्या प्राथमिक तपासात वाहनाची ग्राउंड क्लीअरन्स तुलनेने अधिक असल्याने त्याखाली सहज जाता येते. तसेच कन्व्हर्टर तुलनेने कमी वेळात काढता येत असल्याने चोरांकडून या वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचा संशय आहे.
दरम्यान, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हा वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील घातक वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याची चोरी केवळ वाहनमालकासाठी आर्थिक नुकसानकारक नसून पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर बाब मानली जाते.
या प्रकरणी संशयितांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासात या चोरीमागील संपूर्ण नेटवर्क, चोरीचा माल खरेदी-विक्री करणारे व्यक्ती आणि त्याची पुढे कुठे विल्हेवाट लावली जाते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.










