⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

इंटरनॅशनल पाेस्टर चित्र स्पर्धा : पाचोऱ्याच्या अक्षय पाटील, अजय विसपुते यांच्या चित्रांना पारिताेषिक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित इंटरनॅशनल पोस्टर चित्रकला स्पर्धेत येथील रंगश्री आर्ट फाउंडेशनचे विद्यार्थी अक्षय श्रीराम पाटील यास १५ हजारांचे प्रथम तर अजय पांडुरंग विसपुते यास ७ हजार ५०० रुपयांचे द्वितीय पारिताेषिक मिळाले. पाचाेरा वासीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

या स्पर्धेत सुमारे १२०० ते १४०० कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता. या स्पर्धेत क्रिएटिव्ह गांधी, कोरोनासे क्या सीख पाए, ग्रीन अर्थ या ३ विषयांवर चित्र साकारायची होती. या स्पर्धेत केवळ भारतातून नव्हे तर इतर देशांतूनही चित्रे आली होती. त्यांना सुबोध कांतायन यांचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे नामवंत परीक्षक हाेत. आंतरराष्ट्रीय ऍड. मॅन तथा स्पेस डिझायनर उदय पारकर, आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परीक्षकांनी या स्पर्धेतील चित्रांचे परीक्षण केले. त्यामुळे अक्षय पाटील व अजय विसपुते यांना मिळालेल्या पारितोषिकांचे महत्त्व वाढले आहे.
अक्षय व अजय यांच्या या यशाबद्दल रंगश्री संस्थेच्या अध्यक्षा मंजुळा सोनार, सुबोध कांतायन, भारती कांतायन, अजय पाटील, विशाल सोनवणे, वैभव शिंपी, आकाश सावंत, तन्मय पाटील यांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले. परिसरातूनही त्यांचे अभिनंदन हाेत आहे.