⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

व्यावसायिक वाटचालीत बौद्धिक संपदा महत्त्वाची : डॉ.डब्लू.एम. धूमाने

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । ‘सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत नवनिर्मिती व संशोधनाचा स्पर्धात्मक लाभ घेण्यासाठी व्यावसायिक वाटचालीत ‘बौद्धिक संपदा’ महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन भारत सरकारचे माजी पेटंट अटॉर्नी जनरल डॉ.डब्लू.एम. धूमाने यांनी केले.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत बौद्धिक संपदा कक्ष तसेच महाराष्ट्र नॅशनल विधी विद्यापीठ, मुंबई आणि जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.व आय.आय.पी.यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट या विषयावरही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती व टीप्सही दिल्या.

यावेळी बोलतांना महाराष्ट्र नॅशनल विधी विद्यापीठाचे डॉ. साजिद शेफ म्हणाले की, बौद्धिक संपदेचे सरंक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब असून, कॉपीराइटचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंत व्यक्तीच्या कुटुंबियांना रॉयल्टी मिळण्यासाठी होतो. तशी तरतूद भारतीय कायद्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थांच्या लोगोचा मालकी हक्क अबाधित राहण्यासाठी दर १० वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. या कार्यशाळेत ‘बौद्धिक संपदा अधिकारांचे उद्योग व्यवसायातील फायदे’ या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

बौद्धिक संपदा आधुनिक काळाची गरज
कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी, ‘मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक संपदा आहे. ही आपल्याला दैनंदिन जीवनात विविध स्वरूपात उपयोगास येत असते, तसेच ती आधुनिक काळाची गरज आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट याद्वारे आपण नवनिर्मिती व संशोधनास सुरक्षित करू शकतो. उद्योजक व व्यावसायिकांनी संशोधित तंत्रज्ञान, डिझाईन व उत्पादनाचे पेटंट केल्यास त्यास कायदेशीर पाठबळ मिळून भविष्यातील आर्थिक व मानसिक त्रास टाळता येऊ शकतो, असे सांगितले. कार्यशाळेसाठी आय.क्यू.ए.सी. विभागाचे प्रमुख प्रा. राजकुमार कांकरिया, आयआयसी विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता, संगणक विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील, व महाराष्ट्र नॅशनल विधी विद्यापीठ मुंबईच्या प्रा. गुंजन देशपांडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले.