पीक नुकसानीची आ.चंद्रकात पाटलांकडून पाहणी; प्रशासनाला दिल्या पंचनामे करण्याच्या सूचना!

जळगाव लाईव्ह न्युज|सुभाष धाडे| आज दुपारी २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन उद्भवलेल्या नैसर्गिक वादळ वाऱ्यासह तालुक्यातील काही भागात झालेल्या गारपीटीमुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडली तर विजेच्या खांबासह तारा तुटण्याच्या घटना घडल्या असून केळीसह मका व कांद्यासह शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

दरम्यान, आज शुक्रवारी २८ एप्रिल रोजी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची लगबग सुरू होती यातच भर दुपारी आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड नुकसान केल्याचे दिसून आल्याने निवडणुकीच्या कामाजात व्यस्त असताना देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच पिंप्री आकाराऊत , घोडसगाव शिवारातील काही शेतकऱ्यांचा बांधावर जावून पाहणी केली. आणि तहसिलदार श्वेता संचेती यांना लागलीच पंचनामे करण्याच्या सूचना केल्या तसेच वादळी पाऊस व गारपीटीचा प्रचंड तडाखा पाहता मतदार संघातील इतर ही गावांमध्ये नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याने आ चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांचेसह कृषी विभागाला सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, प्रवर्तन चौकातील एस टी बस आगारासमोर मोठे झाड वादळाने तुटुन पडल्याने रहदारी ठप्प झाली होती. आमदारांनी येथे स्वतः उपस्थित राहून जे सी बी द्वारे झाडाला काढून रस्ता मोकळा केला. दरम्यान तालुक्यातील अनेक शिवारात गारपीट झालेली असुन या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन प्रशासनाकडून उद्या तात्काळ पंचनामे केल्या जातील असे विश्वसनीय सुत्रांकडुन समजते.