⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खाद्यतेल स्वस्त होणार; अखेर इंडाेनेशियाने पामतेलावरील निर्यातबंदी हटविण्याचा घेतला निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । सध्या वाढत्या महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे दर लवकरच स्वस्त होणार आहे.

इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश असून गेल्या महिन्यात, 28 एप्रिल रोजी, इंडोनेशियाने देशातील वाढत्या किमती रोखण्यासाठी क्रूड पाम तेल आणि त्यातील काही डेरिव्हेटिव्ह उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, आता इंडोनेशियाने 23 मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी ही घोषणा केली. इंडोनेशियाच्या खासदारांनी सरकारला निर्यात बंदीचा आढावा घेण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत एकूण देशांतर्गत खाद्यतेलाच्या मागणीच्या ५८ टक्के खाद्यतेल आयात करताे. यात सर्वाधिक वाटा पामतेलाचा असून एकूण मागणीच्या ६५ टक्के पामतेल इंडाेनेशियातून तर ३५ टक्के मलेशियातून आयात होते. सूर्यफूल तेलाच्या एकूण आयातीपैकी युक्रेनमधून ७० टक्के तर रशियातून २० टक्के आणि अर्जेंटिनातून १० टक्के आयात होत असते. सध्या युक्रेन-रशियातील आयात ठप्प असून इंडोनेशियातील आयातही निर्यातबंदीमुळे बंद होती. त्यामुळे सगळेच खाद्यतेल लिटरमागे २५ ते ३० रुपयांनी दर वाढले होते. आता इंडाेनेशियातून आयात सुरू झाल्यानंतर हे दर इतकेच कमी होऊ शकतात.