जळगाव लाईव्ह न्यूज । बांगलादेशात झालेल्या मोठ्या सत्तापरिवर्तनानंतर पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत–बांगलादेश संबंध अधिक दृढ होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, नव्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतात खळबळ उडाली आहे. तारिक रहमान सरकारने हैराण करणारा आणि अतिशय धक्कादायक असा निर्णय घेतला.

काय आहे तो निर्णय?

बांगलादेश सरकारने भारतीय बजेट एअरलाइन स्पाइसजेटला आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे विशेषतः कोलकाता ते गुवाहाटी या मार्गावरील काही उड्डाणांना पर्यायी आणि अधिक लांब मार्गांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, उड्डाणाचा कालावधी आणि इंधन खर्च वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सकारात्मक राहिले असले तरी अलीकडच्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच या निर्णयाची भर पडली आहे.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एअरलाईन नेव्हिगेशन शुल्क आणि ऑपरेशनल बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या नियमानुसार उड्डाणे सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र, थकबाकीची रक्कम आणि तपशील अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, या घडामोडीनंतर स्पाइसजेटच्या समभागांमध्ये सुमारे १ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले.
बांगलादेशाने अलीकडेच पाकिस्तानसोबत विमानसेवा सुरू केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशाच्या निर्णयाकडे राजनैतिक आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.











