जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२६ । आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आणि उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दर महिन्याला काही आर्थिक बदल होतात, ज्याचा आपल्या मासिक खर्चावर परिणाम होतो. त्याच नुसार आता १ मार्च २०२६ पासून, भारतात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होईल.

खरं तर, या 1 मार्चपासून स्वयंपाक घरापासून ते मोबाईल फोनविषयी अनेक बदल दिसतील. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगचा पण समावेश आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून येऊ शकतो. काय काय होणार बदल, जाणून घ्या.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल
एलपीजी सिलिंडरच्या किमती दरमहा बदलतात. गेल्या काही महिन्यांपासून, फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल दिसून आला आहे. सध्या, एलपीजीच्या किमती स्थिर आहेत. गेल्या महिन्यात, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती अंदाजे ₹४९ ने वाढल्या. त्यामुळे १ मार्च २०२६ रोजी किमतींमध्येही बदल होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगसंबंधी बदल
1 मार्चपासून रेल्वेकडून तिकीट बुकिंग सिस्टिममध्ये मोठा बदल होणार आहे. जुन्या ॲपमधून जनरल तिकीट वा प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा बंद होईल. प्रत्येक दिवशी लाखो यात्री मोबाईल फोनद्वारे तिकीट बुक करत होते. पण आता त्यांना 1 मार्चपासून ही सुविधा बंद होईल. 1 मार्चपासून जुनी UTS ॲप बंद होईल. आता Rail One App मदतीने जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट याशिवाय तिकीट आरक्षण करता येईल.
UPI चा नवीन नियम
डिजिटल पेमेंट सहज होण्यासाठी 1 मार्चपासून अधिक सुरक्षा देण्यात येईल. UPI च्या माध्यमातून मोठी रक्कम पाठवताना अजून एक दोन टप्पे पार करावे लागतील. 1 मार्चपासून UPI PIN सह बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, एक्सट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल.
बँक खात्यात किमान शिल्लक नियम
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका १ मार्च २०२६ पासून किमान शिल्लक रकमेच्या आवश्यकतांमध्ये बदल करणार आहेत. नवीन नियमानुसार, जर सरासरी मासिक शिल्लक रकमेच्या आधारावर बँक खात्यातील शिल्लक रक्कम कमी पडली तर त्यावर दंड आकारला जाईल. पूर्वी, जर एकाच दिवशी शिल्लक रक्कम कमी पडली तर दंड आकारला जात असे.
सोशल मीडियाबाबत बदल
1 मार्चपासून व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या ॲपमध्ये बदल दिसून येईल. मॅसेजिंग ॲप्सवर नवीन सिम बायडिंगचा नियम लागू होईल. या नियमातंर्गत WhatsApp, Telegram सारखे ॲप सक्रिय सिम कार्डशी जोडलेली असतील. जर फोनमध्ये सिम कार्ड नसेल तर हे ॲप्स चालणार नाही.











