⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयावर IMF प्रमुख नाराज, म्हणाले पुन्हा विचार करा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । देशांतर्गत बाजारात वाढत्या गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMF प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा या नाराज झाल्या आहे. त्यांनी भारताने लवकरात लवकर गव्हाच्या निर्यातीवरील बंदीबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाशी केलेल्या संभाषणात त्या म्हणाल्या की, भारताला १.३५ अब्ज लोकांना अन्न पुरवण्याची गरज आहे. याबद्दल मी भारताचे कौतुक करते. मला समजले आहे की उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाची उत्पादकता कमी झाली आहे, परंतु तरीही मी भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करते. कारण इतर देश देखील त्याच पावलावर पाऊल ठेवू शकतात. अन्न संकटाचा सामना करण्यात आपण अपयशी ठरू.

निर्यातबंदी उठवल्यास भारताला किती मदत मिळेल असे विचारले. यावर जॉर्जिव्हा म्हणाल्या की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत किती निर्यात करू शकतो आणि कोणत्या देशांना निर्यात करू शकतो यावर ते अवलंबून आहे. जर इजिप्त आणि लेबनॉन सारख्या देशांमध्ये गहू निर्यात केला गेला तर त्याचा नक्कीच मोठा परिणाम होऊ शकतो कारण पुरवठा खंडित होण्यामुळे ते सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. इजिप्त आणि लेबनॉनला केवळ उपासमारीचा धोका नाही तर सामाजिक अशांतता पसरू शकते, ज्यामुळे जागतिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो.

चीननंतर गव्हाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताने 13 मे रोजी तत्काळ प्रभावाने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. गव्हाच्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे आणि किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्याने देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला. भारतात उष्णतेच्या लाटेमुळे मार्चमध्ये गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते

दरम्यान, G7 देशांच्या कृषी मंत्र्यांनीही भारताच्या गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर टीका केली. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला, त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर झाला. जर्मनीचे कृषी मंत्री सॅम ओझडेमीर म्हणाले, “जर प्रत्येकाने निर्यातीवर बंदी घातली किंवा बाजार बंद केला तर ते संकट अधिक गडद करेल.” G20 गटाचा सदस्य म्हणून भारताने आपली जबाबदारी पार पाडावी असे आम्ही आवाहन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी दौऱ्यावर असताना जागतिक स्तरावर गव्हाचा तुटवडा जाणवत असल्याची कबुली देत ​​देशातील शेतकरी जगाला पोसण्यासाठी पुढे आले असल्याचे सांगितले होते. जेव्हा जेव्हा मानवतेवर संकट आले तेव्हा भारताने त्यावर उपाय शोधला आहे.