शनिवार, डिसेंबर 2, 2023

जळगावसह या जिल्ह्यांना १८ जुलैला मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे.

या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.