जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२५ । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान आता राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होणार आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असताना खान्देशसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे याठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चला राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
१ एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. १ एप्रिलला राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम चक्रवातामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.