जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून यातच राज्यातील विविध भागात अद्यापही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे.यात जळगावला आजपासून दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
दरम्यान, राज्यात सध्या अवकाळीनं थैमान मांडल्याचं दिसत आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज देखील राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२४ एप्रिल रोजी मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. धुळे (४१), जळगाव (४०.८), ब्रह्मपुरी (४०.८) ही ४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे आहेत.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कार्यरत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. मात्र मध्य महाराष्ट्रावर सक्रिय असलेल्या चक्रिय स्थितीमुळे राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कमाल तापमान देखील मागील काही दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसच्या आसपास रेंगाळले आहे. उष्णतेचा तडाखा कायम असून, रात्रीच्या उकाड्यात तेवढीच वाढ झालेली.