जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत चालली असून जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार समोर येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड रुग्णालय जाहीर करण्यात आले असून गंभीर रुग्णांना देखील वेळीच उपचार मिळत नाही तर काहींना बेडच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगावातील एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा येत असल्याने तिला छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पैसे घेऊन तिची कोविड टेस्ट करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली. महिलेला रिक्षाने जिल्हा कोविड रुग्णालयात आणण्यात आले. तासभर महिला जमिनीवर पडून असताना देखील तिला उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत एक ३५ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असून तिच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल ५० पर्यंत आली आहे. महिलेला नातेवाईक घेऊन आले असता बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. नातेवाईक दोन तास बाहेर गेटवर थांबून ठेवल्यानंतर नातेवाईकांनी राजकीय मान्यवर आणि पत्रकारांना कळविल्यावर महिलेला आपत्कालीन विभागात दाखल करून घेण्यात आले. दरम्यान, नातेवाईकांनी दुसरीकडे व्यवस्था करून घ्यावी असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/143607250997178/