जळगाव लाईव्ह न्यूज । रिझर्व्ह बँकेने (RBI) अलिकडेच रेपो दरात कपात केल्यानंतर, वेगवेगळ्या बँका व्याजदरात बदल करत आहेत. अलिकडेच सरकारी बँकांनी ग्राहकांना त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात दिलासा दिला होता. मात्र यातच आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरात ०.२५ टक्के कपात करून ग्राहकांना झटका दिला आहे. आयसीआयसीआय बँकेचे सुधारित दर आज बुधवारपासून लागू झाले आहेत.

सलग दोनदा व्याजदर कपात
आरबीआयने सलग दोनदा व्याजदरात कपात केल्यानंतर एचडीएफसीने ठेवींमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या ठेवीदारांना ५० लाख रुपयांपर्यंतच्या बचतीवर बँकेकडून २.७५ टक्के व्याज दिले जाईल, जे एचडीएफसी बँकेच्या ऑफरसारखेच आहे. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी ते ३.२५ टक्के असेल.
SBI चा व्याजदर २.७० टक्के
आयसीआयसीआय बँकेचे सुधारित दर आजपासून म्हणजेच बुधवारपासून लागू झाले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय सध्या बचत बँक खात्यांवर २.७० टक्के व्याज देत आहे. गेल्या काही दिवसांत इतर बँकांनीही एफडी व्याजदर कमी केले आहेत. काही दिवसांपूर्वी आरबीआयने सलग दुसऱ्यांदा मुख्य व्याजदर कमी केल्यानंतर बँकांकडून ठेवींवरील व्याजदरात कपात सुरू झाली आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांत रेपो दरात एकूण ०.५० टक्के घट झाली आहे.
व्याज उत्पन्नावरही दबाव
केंद्रीय बँकेने हे देखील स्पष्ट केले की व्याजदरांमधील बदलांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर लवकर दिसून यावा अशी त्यांची इच्छा आहे, ज्यामुळे आर्थिक विकासाला गती देण्याचे लक्ष्य साध्य होण्यास मदत होईल. गेल्या काही तिमाहीत बँकांना ठेवी उभारणे खूप कठीण झाले आहे, या काळात रोख रकमेची कमतरता देखील दिसून आली. अलिकडे बँका त्यांच्या निव्वळ व्याजदरावरील दबावाबद्दल बोलत आहेत.