जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । अजितदादा यांनी रविवारी अचानकपणे सगळ्यांना धक्का देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मी जळगाव तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची संवाद साधला. आपल्या राजकीय यश आणि अपयशामध्ये कार्यकर्ते मोठी भूमिका बजावत असतात. अशावेळी त्यांची भूमिका जाणून घेणे अत्यंत गरजेचं असतं. यामुळेच मी जळगाव तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व शंभर टक्के कार्यकर्त्यांनी आपण पवार साहेबांसोबतच राहिला पाहिजे असे सांगितले. यामुळे मी पवार साहेबांसोबतच राहणार आहे. असे प्रतिपादन पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध मला निवडणूक लढवायची आहे. अशावेळी कार्यकर्त्यांच्या मते मी पवार साहेबांसोबत राहिलो तरच ते शक्य होणार आहे. अजितदादा सोबत गेलो आणि सरकारमध्ये राहिलो तर पुढे जाऊन यामध्ये अडचणी येतील. यामुळे मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर ते असेही म्हणाले की, येत्या काळात कोणतेही चिन्ह मिळो. पक्ष आम्हाला मिळो की न मिळो. आम्ही पवार साहेबांसोबत ठाम आहेत. कोणत्याही चिन्हावर आम्ही पवार साहेबांसोबत निवडणूक लढवणार आहोत. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्या पदाधिकारी, माजी आमदार व कार्यकर्ते हे पवार साहेबांसोबत ठाम आहेत. उद्या पवार साहेब याबाबत बैठक घेणार असून आम्ही सर्व त्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत.