जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आयकरात दिलासा दिल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. RBI चे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 25 बेसिस पॉईंट कपातीची घोषणा केली आहे. म्हणजेच रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचाही EMI चा भार काहीसा हलका होणार आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, सर्वसामान्यांच्या गृहकर्जाचा EMI कसा कमी होणार? ते आपण जाणून घेणार आहोत.. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि त्यावर 8.5 टक्के व्याजदर असेल, तर तुमचा EMI सध्या 17,356 रुपये आहे. पण रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने कमी केल्यानंतर व्याजदर 8.25 टक्के होईल. कमी झालेल्या व्याजदरावर तुम्हाला 17,041 रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच दरमहा 315 रुपये आणि वार्षिक 3,780 रुपयांची बचत होईल.
आता दुसऱ्या उदाहरणासाठी, जर तुमचे गृहकर्ज 30 लाख रुपये असेल, तर 8.5 टक्क्यांच्या आधारे तुमचा ईएमआय 26,035 रुपये आहे. परंतु व्याजदर 8.25 टक्के राहिला तर तो 25,562 रुपयांपर्यंत कमी होईल. म्हणजेच व्याजदर कमी झाल्यानंतर तुम्हाला दरमहा ४७३ रुपये कमी द्यावे लागतील आणि तुमची वार्षिक ५,६७६ रुपये वाचतील.
त्याचप्रमाणे, जर तुमचे गृहकर्ज 40 लाख रुपये असेल, तर 8.5 टक्के व्याजदरावर आधारित 20 वर्षांसाठी EMI 34,713 रुपये आहे. पण 8.25 टक्के व्याजाच्या आधारे ते 34,083 रुपये कमी होईल. म्हणजेच 40 लाख रुपयांच्या ईएमआयवर तुमची दरमहा 630 रुपये आणि वार्षिक 7,560 रुपये वाचतील.
जर आपण 50 लाखांच्या गृहकर्जावर ही गणना केली तर 8.5 टक्के व्याजाच्या आधारे 20 वर्षांसाठी EMI 43391 रुपये आहे. पण जर व्याजदर 8.25 पर्यंत कमी झाला तर EMI 42,603 रुपये कमी होईल. अशा प्रकारे, ईएमआयवर दरमहा 788 रुपये आणि वार्षिक 9,456 रुपयांची बचत होईल.
टीप : वरील गणित हे अंदाजे व एक उदाहरण म्हणून दिले आहे. निश्चित किती ईएमआय कमी होईल हे तुमचा व्याजदर, कालावधी, बँकेचे धोरण अशा अन्य गोष्टींवर अवलंबून असेल.