⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सातदेवीची कशी झाली मायादेवी ? जाणून घ्या मायादेवीची रहस्यमय कहाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगावातील महाबळच्या मुख्य रस्त्यालगत असलेले श्री.स्वयंभू मायादेवी देवस्थान अनेकांचं श्रद्धास्थान आहे. रस्त्यालगत असल्याकारणाने भाविक मायादेवी मातेचं दर्शन घेण्यावाचून पुढे जात नाही. मायादेवी मंदिराचा अद्भुत इतिहास असून, सन १९७१ मध्ये दगडी सात बाणे शेंदूर लागले मिळून आले होते. तर जाणून घेऊ श्री. स्वयंभू मायादेवी देवस्थानाची रहस्यमय कहाणी…

‘तो मातीचा ढिगारा खोदा आम्हाला बाहेर काढा’

जळगावातील शासकीय रूग्णालय येथे श्री. मंनसाराम भाईदास लोहार हे कारपेंटर म्हणून नोकरीला असताना त्यांना सन 1970 साली सिव्हिल सर्जन बंगल्यात आउट हाउस रहाण्यास मिळाले. त्यावेळी सिव्हिल सर्जन डाॅ. श्री. डी. के. कडासनी हे कार्यरत होते. आता ज्याठिकाणी मायादेवी मातेचं मंदिर आहे ते गाडगीळ वकिलांचे शेत होते. बंगल्यांच्या खुले मैदानाचे दक्षिण दिशेला ह्या शेताचा बांध होता. शेताचे बांधा लगत एक मातीचा ढिगारा होता त्यावर भले मोठे एक बोरीचे झाड होते. रात्री अपरात्री शौचास व इतर कामासाठीसाठी कुणी बाहेर निघाल्यावर दूरून येथे काहीतरी पेटलेले दिसायचे. सकाळी ह्या ठिकाणी येवून पाहिल्यावर राख कोळसा जळाल्याचे काही अवशेष दिसून येत नव्हते. या गोष्टीची धास्ती घेत मंनसारामजी आजारी पडले त्यांना भयंकर ताप आला आणि ते तापात बडबडू लागले. ‘तो मातीचा ढिगारा खोदा आम्हाला बाहेर काढा’ असे एक महिना भर वारंवार घडत राहिले. स्वतः सिव्हिल सर्जन त्यांचा उपचार करीत होते पण काहीही फरक पडत नव्हता.

मन्सारामजींचा आजार आणि देवीचे सापडले ७ बाण

शेवटी सिव्हिल सर्जन यांनी हा प्रकार त्यावेळचे डि. एस. पी. श्री.मेहरा यांना सांगितला. त्या ठिकाणी नेमके काय आहे हे खोदून पाहण्यासाठी दिनांक 6 ऑक्टोबर 1971 रोजी संध्याकाळी 7 वाजेला काही पोलीस आणि बंगल्यातील पाच, सहा शिपाई यांनी कंदील लावून खोदकामास सुरूवात केली. तेव्हा मंनसारामजी फनफनत्या तापात घरीच खाटेवर झोपून होते. भलामोठा मातीचा ढिगारा खोदायला रात्रीचे दोन वाजून गेले आणि काही वेळातच दगडी सात बाणे शेंदूर लागलेल्या स्थितीत नजरेस पडले. तसेच खाटेवर झोपलेले मंनसारामजी ताडकन उठून धावतच बंगल्याच्या नळावर गेले, भरलेली पाण्याची बादली अंगावर ओतली आणि तसेच धावत पळत ह्या ठिकाणी आले आणि बेशुद्ध पडले. स्वतः कडासनी साहेब आणि मेहरा साहेब या गोष्टीचे साक्षीदार होते. ते संपूर्ण रात्र तिथे हजर होते. कडासनी साहेबांनी मंनसारामजींचे तोंडावर पाणी शिंपडले तसे मंनसारामजींचे तोंडून शब्द बाहेर पडले. ‘महाकाली माता की जय, नवदूर्गा माता कि जय, बालक… आम्हाला आताचे आत्ता शेंदूर लावा नाहीतर आमचे तेज वाढत जाईल आणि त्यात सर्व जण भस्म होतील. तेव्हा मेहरा साहेब म्हणाले, ‘माताजी ईतने रातमे हम कहासे शेंदूर लायेंगे हमारे पास तो कुछ भी नही है’ तेव्हा मंनसारामजींचे अंगात मातेचा संचार आलेला होता. तेव्हा माता म्हणाली ‘जाओ बंगलेमे धुंडो’ बंगल्यातील शिपाई व्दारका परदेशी धावतच गेले आणि त्यांना बंगल्यातील फ्रिजवर शेंदूराची पुडी सापडली. हा मातेचा पहिलाच चमत्कार होता. दि.7 ऑक्टोबर 1971 रोजी देवीमाता प्रगट झाली.

जळगावात पसरली वार्ता.. अश्याप्रकारे सातदेवीची झाली मायादेवी
सरकारी दवाखान्यातल्या माणसाला देव्या सापडल्या हि वार्ता जुन्या गावात वाऱ्यासारखी पसरली. देवीमाता बोरीच्या झाडाखाली सापडली म्हणून लोक बोरिवली माता म्हणू लागले तर सातबाणे सापडले म्हणून कुणी सातदेवी तर कुणी सातबहिणी म्हणू लागले. शेतात सापडल्याने शेत मालकाने बरेच वाद घातले शेवटी त्यांनी शेत वसंत कन्हैयालाल शर्मा याना विकले त्यांनी ही बरेच वाद घातले. देवीमाता प्रगट झाली तेव्हा हे भयानक जंगल होते. पुढे मातेचा शब्द खरा ठरला जंगलचे मंगल झाले. महाबळ, हतनूर सानेगुरुजी, शारदा महाराष्ट्र बँक अशा अनेक काॅलन्या झाल्या. देवीमाता भक्तांचे नवसांना पावू लागली. मातेची माया वाढतच गेली आणि सातदेवीची मायादेवी झाली. जागेचे वाद कोर्टात गेले. मंनसारामजी यांना मनाई हुकूम लागला. अपिलात असतांना मंनसारामजी महाराज आजारपणात दिनां 30 डिसेंबर 2003 रोजी समाधीस्थ झाले. आता त्यांचे पश्चात त्यांची चार मुले रमाकांत गोराणे, दिपक, लक्ष्मीकांत, मनोज गोराणे असा परिवार आहे. चारही मुले आपल्या कुटुंबासोबत देवीमातेची पुजाअर्चा नित्यनेमाने करीत आहेत.

मायादेवी मंदिरापर्यंत पोहचायच कसे?
स्वतंत्र चौकाकडून महाबळच्या दिशेने गेल्यावर संभाजी नाट्यगृहाच्या शेजारीच शनी मंदिर आणि शनी मंदिराच्या शेजारीच मायादेवी मंदिर आहे. महाबळपासून सरळ गेलं कि मोहाडी गाव देखील येत म्हणून मोहाडी गावाकडून येताना देखील मायादेवीचे दर्शन होतातच.