जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाच्या मुद्द्यावरून हिना गावित नाराज होत्या. भाजपकडून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी हवी होती. मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे सेनाला मिळाली.
डॉ.हिना गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तसेच आज त्यांनी थेट पक्षालाच रामराम ठोकला आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या केसी पाडवी यांना मिळाली आहे. तर महायुतीत आमशा पाडवी रिंगणात आहेत. त्याचबरोबर डॉ.हिना गावित या देखील या मैदानात उतरल्या आहेत.
म्हणून हिना गावितांनी पक्षाला सोडचिट्टी दिली
गेल्या १० वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीसोबत काम केलं आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागा शिंदे गटाला मिळाली, आता माझ्यामुळे माझ्या पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दारीमुळे मी राजीनामा दिला आहे, असं कारण डॉ.हिना गावित यांनी स्वत: सांगितलं आहे.