जळगाव लाईव्ह न्यूज | २३ सप्टेंबर २०२३ | जिल्ह्यातील अमळनेर, बोदवड, पारोळा, जामनेर तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील लोणवाडीतील २० घरे पाण्याखाली गेली आहेत. शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेली. भिलाली येथील एक जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे बोरी, खडकासह अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसाने अनेक भागांतील शेतात पाणी साचले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी जामनेर रस्त्यावरील पुलावर आल्याने सकाळी दहापर्यंत जामनेर ते तोंडापूर वाहतूक बंद होती.
पारोळा
पारोळा तालुक्यातील म्हसवे, जोगलखेडे, वडगाव प्र. अ. यासह पारोळा, चोरवड, शेळावे, बहादरपूर, तामसवाडी, सार्वे, बोळे या सात मंडळात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे कापसाला आलेली बोंडे गळून पडली आहेत तर मे महिन्याच्या झालेली कपाशीची लागवड धोक्यात आली आहे. मुसळधार पावसाने शेतीचे बांध फुटले असून, शेतात पाणी साचले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामान भिजले आहे. शेतजमीन खरडून पिके वाहून गेली आहे. शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला.
बोदवड
बोदवड तालुक्यातील जामठी, लोणवाडी, येवती, रेवती, धोंडखेडा, कुर्हा हरदो अशा अनेक गावांत पुन्हा एकदा ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. लोणवाडी गावात अनेक घरात पाणी शिरले आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. लोणवाडीतील २० घरे पाण्याखाली गेली आहेत. ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार करीत शेतकऱ्यांसह रहिवाशांचे अतोनात नुकसान केले आहे.
जामनेर
तोंडापूरसह परिसरात रात्रीच्या १ ते ४ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अजिंठा डोंगररांगांमधील नद्यांना पूर आल्याने व तोंडापूर मध्यम प्रकल्प आधीच १०० टक्के भरून ओसाडत असल्याने खडकी नदीला मोठा पूर आला होता. पुरामुळे तोंडापूर ते जामनेर रस्त्यावरील पुलावर सकाळी दहापर्यंत पाणी वरुन वाहत असल्याने वाहतूक बंद होती.
अमळनेर
अमळनेर तालुक्यात पूर्वसूचना न मिळाल्याने बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीला मध्यरात्री अचानक पूर आल्याने बोरी नदी दुथडी वाहत आहे. रात्री प्रवाहाचे प्रमाण जास्त असल्याने भिलाली येथील पुलावरून पाणी वाहत होते. कन्हेरे येथील पुलावरून दोन तीन फूट पाणी वाहत असल्याने सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता.