लोखंडी रॉडने मारहाण करत डोक्याला लावला कट्टा ; पोलिस घेत आहेत ‘त्याचा’ शोध

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । रस्त्याने जाणार्‍या चौघा तरुणांनी खंडणी न दिल्याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून एकाच्या डोक्याला कट्टा लावण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील श्रीराम नगरात शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारी निखील राजपूतसह चौघांविरोधात खंडणीसह, आर्म अ‍ॅक्ट अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत रात्री उशिरा पसार झाले असून बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

खंडणी न दिल्याने डोक्याला लावले पिस्टल व रॉडने केली मारहाण
बाजारपेठ पोलिसात तक्रारदार जय मनोज जाधव (22, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास त्यांच्यासह मित्र अमर देविदास कसोटे, कुणाल राजू शिंदे व आकाश गणेश फबियानी आदी वाल्मीक नगर भागात गप्पा करीत होते व मित्र अमर कसोटेला सोडण्यासाठी दुचाकीने श्रीराम नगरात गेल्यानंतर दत्त नगर, हनुमान मंदिराजवळ संशयित निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांनी रस्ता अडवला व इधर आने का नही म्हणत, गली मे आना है तो पैसा भरणा पडेगा म्हणत संशयीतांनी अमर कसोटीचे गच्ची पकडून त्याच्या कानशीलाला कट्टा लावत पैशांची मागणी केली तसेच अन्य संशयीतांनी मित्रांचे खिसे तपासले मात्र रक्कम न मिळाल्याने निखील राजपूतने यांच्याकडे पैसे नसल्याचे यांचे हातपाय तोडून टाका , असे सांगितल्याने अन्य संशयीतांनी लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. अमर व जय यांच्या डोक्याला लोखंडी रॉड मारण्यात आला तर अन्य दोघा मित्रांना पायावर रॉड मारण्यात आला तर या आकाश हा दुचाकी घेवून तिथून निसटण्यात यशस्वी झाला मात्र आरोपींनी कुणाल राजू शिंदे याची दुचाकी (एम.एच.19 सी.डी.9308) ला रॉडने मारून तिचे नुकसान केले. मारहाण सुरू असताना दहशतीमुळे नागरीकांनी घरांचे दरवाजे लावून घेतले व कुणीही मदतीसाठी बाहेर आले नाही.

घर खाली करण्यासाठी दिली धमकी
जखमी अवस्थेत तरुण बाजारपेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांना मेमो दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले मात्र याचवेळी चौघा आरोपींनी अमर देविदास कसोटे याच्या घरी जावून त्याच्या कुटुंबियांना धमकावत दोन दिवसात घर खाली करण्याची धमकी दिली अन्यथा मोठ्या मुलाला मारले आहे, छोट्याला देखील मारू, अशी धमकी देत पळ काढला.

रात्रीच झाले संशयीत पसार
या गुन्ह्याप्रकरणी जय मनोज जाधव (22, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्या फिर्यादीवरून निखील राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, पवन चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत शनिवारी रात्रीच पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ बाजारपेठ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.