गुटखा तस्कर पिता-पुत्र जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा तस्करी आणि विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या दोघा पिता-पूत्राला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. रमेश जेठानंद तेजवाणी (५८) व दीपक रमेश तेजवाणी (२४ दोघे रा. सिंधी कॉलनी) असे या दोघा पितापुत्राचे नाव असून याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश तेजवाणी व दीपक तेजवाणी हे अनेक वर्षापासून गुटख्याच्या व्यवसायात सक्रिय होते. रमेश तेजवाणी विरुद्ध चार तर मुलगा दीपक तेजवाणी याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटल, योगेश बारी, साईनाथ मुंडे, छगन तायडे, किरण पाटील यांनी सादर केला होता त्यानुसार मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दोघांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. पिता-पुत्राला ताब्यात घेत त्यांना बऱ्हाणपूर येथे सोडण्यात आले आहे.