जळगावमध्ये FDA चा मोठा दणका! एमआयडीसीतील गोदामातून लाखोंचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

जुलै 16, 2026 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात गुटखा, बनावट व भेसळयुक्त अन्नपदार्थांवर मोठ्या प्रमाणात धडक कारवाया सुरू आहेत. याच मोहिमेदरम्यान जळगावात एफडीएच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका गोदामावर छापा टाकून तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gutka jpg webp

१४ जुलै रोजी सह आयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने एमआयडीसीतील सेक्टर एम-१२४ मधील एका गोदामावर छापा टाकला. पाहणीदरम्यान गोदामात ‘गोवा’ ब्रँडच्या गुटख्याची ४ हजार ८०० पाकिटे आढळून आली. यात प्रत्येकी ७५ पाऊच असलेली ३ हजार ३०० पाकिटे आणि प्रत्येकी २६ पाऊच असलेली १ हजार ५०० पाकिटे असा एकूण १२.१५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वकार शेख जब्बार शेख (वय ३२) आणि धीरज मिश्रा (दोन्ही रा. शाहूनगर, जळगाव) या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत हा गुटखा भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

जागा मालकाचीही भूमिका तपासणार

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीत संबंधित गोदामाच्या मालकाचा या प्रकरणात सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच गुटख्याचा विक्रेता, पुरवठादार, उत्पादक आणि या साखळीत सहभागी इतर व्यक्तींचा शोध घेऊन संघटित गुन्हेगारी आणि अवैध आर्थिक व्यवहारांचा तपास करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सध्या अन्न पदार्थातील भेसळ, गुटखा, पानमसाला, वाहतूक, विक्री या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई केली जात आहे. तरीदेखील शहरात गुटखा येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories