⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गुरुपौर्णिमा विशेष : जळगावचे बंडखोर नगरसेवक गुरुचरणी, मुख्यमंत्री शिंदेंची भेट!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे. जळगाव मनपात वर्षभरापूर्वी भाजप नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या आधारामुळे बंडखोरी केली होती. जळगाव मनपातील बंड यशस्वी झाल्यानंतर काही नगरसेवक नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहे. आज गुरुपौर्णिमेचे निमित्त साधत राजकीय गुरू एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहचले. मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांनी भेट घेतली.

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा गट स्थापन झाला आहे. दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याने भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले असून त्यात माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या एक दिवस अगोदर देखील जळगाव शहर मनपातील ६ नगरसेवकांनी मुंबई गाठत एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेला जळगावातून मिळालेला पहिला धक्का पचत नाही तोच आणखी ३ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

आता गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बंडखोर नागरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या पंचवार्षिकला ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ६६ नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जळगाव मनपातील देखील नगरसेवक चेतन सनकत, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता आज त्यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे.

वर्षभरापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे कुलभूषण पाटील यांना हाती धरत भारतीय जनता पक्षातून तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेत आणले आणि जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला. काही दिवसांनी त्यापैकी ५ नगरसेवक हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याने बंडखोरांची संख्या २३ वर येऊन पोहचली होती. गेल्या आठवड्यात २३ मधील ६ नगरसेवकांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये न जाता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. जळगाव शिवसेना पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच नगरसेवक प्रवीण कोल्हे, उषा संतोष पाटील, सुनील पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाले होते. यानंतर आज काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत यांनी शिंदे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन केले.