⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

राष्ट्रवादी व शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच? आता ना.गुलाबरावांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil) यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावे, असे साकडे घातले होते. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले आहे. याला उत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून त्यांनी नवस केला. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर सातारा येथील एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले आहे. याला उत्तर देताना प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावे असे वाटते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही त्यांचा पक्ष मोठा व्हावा, असे वाटत असेल यात चुकीचे नाही, असे सांगतानाच मंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी थेट इच्छा व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची ओळख असल्याने मुंबईवर लक्ष देणे गरजेचे असल्याच प्रत्युत्तर देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ही यावेळी जोरदार समाचार घेतला.