जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेने सोमवार व मंगळवारी संपुर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, खुलासा करत सर्व बातम्या खोट्या असून ते शेवटपर्यंत राष्ट्रवादीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी करत अजित पवार व भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागले, हे एखाद्या ब्राम्हणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळी लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राम्हणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणीही त्यांनी केली.
काल म्हणाले होते…
अजित दादा आता राष्ट्रवादीत फार काळ थांबतील असं वाटत नाही. ते डॅशिंग नेते आहेत. त्या माणसालाही जीवन आहे. २४ तास काम करणारे माणूस आहेत. त्यामुळे ते घाबरून निर्णय घेतील असं नाही. जुळवाजुळव करायला थोडा वेळ घेतील, पण लवकरच ते भूमिका घेतील. आता पवार काहीही म्हणाले असले तरीही त्यांना ही सगळी जुळवाजुळव करायला वेळ लागेल. कालपासून आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कोकाटे, बनसोडे, तटकरे बाई म्हणतात आम्ही अजितदादांच्या मागे आहेत. आमदार बोलतायत याचा अर्थ राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण आहे. कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.