महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नाव भूकंप घडून येणार? आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मंत्री गुलाबरावांनी केला मोठा दावा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२३ । शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निकालावर राज्याच्या राजकारणाचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. दरम्यान, या निकालाच्याआधी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असताना आता याप्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठा दावा केला आहे.
नेमका काय आहे गुलाबराव पाटीलांचा दावा?
“शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात काहीच होणार नाही. या सर्व वावड्या आहेत, रामलल्लाच्या कृपेने आम्ही सत्तेत राहणार आहोत”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. नव्या वर्षात तुमचा संकल्प काय? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला.
त्यावर त्यांनी “सरकारच्या माध्यमातून शेतकरी असेल किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. येणारं वर्ष हे रामलल्लाचं वर्ष आहे. या नवीन वर्षामध्ये रामलल्ला येत आहे. त्याबरोबरच पुढचा काळातही रामराज्य देशात असावं ही नवीन वर्षाची मनोकामना आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
पुढील वर्ष निवडणुकीचं आहे. तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभं राहणार, यंदा मात्र शिवसेनेत फूट पडली आहे, त्यामुळे निवडणुकीत पुन्हा निवडून येणार का, काय वाटतं? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो. मात्र हिंदुत्वाच्या विचाराने भाजप-शिवसेनेची युती होती. त्याच पद्धतीने आता आम्ही युती केलेली आहे. देशाचा आणि राज्यातील जनतेचा कल पाहिला तर नवीन वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या तीनही पक्षांच्या महायुतीचाच विजय होईल, अशी मला खात्री आहे”, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.