पशुपालकांनो सावधान! ‘एल निनो’ मुळे वाढणार तापमान; ‘अशी’ घ्या आपल्या पशुधनाची काळजी..

एप्रिल 23, 2026 5:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ‘एल निनो’मुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने सर्वंकष तयारी केली असून पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. उष्णलहरींच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी सर्व पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

tapma

पशुसंवर्धन आयुक्तालयाने क्षेत्रीय स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देत पशुपालकांनी पशुधनाच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. उष्णतेमुळे पशुधनावर ताण येऊ नये यासाठी स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी, संतुलित आहार, तसेच क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शेती व वाहतूक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना सकाळी ११ ते सायंकाळी ४ या कालावधीत विश्रांती देणे, गोठ्यांमध्ये सावली व खेळती हवा राखणे, तसेच उष्णता कमी करण्यासाठी छतावर गवत किंवा पालापाचोळा टाकून पाणी मारणे अथवा स्प्रिंकलरचा वापर करणे, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. उष्णलहरीपूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांविरुद्ध प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधोपचार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित सावलीत हलवून थंड पाण्याचा शिडकावा करावा व जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.दरम्यान, सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला असून फिरती पशुवैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान विभागाशी समन्वय ठेवून तापमानातील बदलांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी, असे आवाहन विभागाने केले आहे. पशुपालकांनी उष्णलहरींच्या काळात पशुधन उघड्यावर बांधू नये, गर्दी टाळावी व भर उन्हात वाहतूक करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पशुधनाचे संरक्षण करावे. कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा ‘१९६२’ कॉल सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now