⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

बालकांना लस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज रोजी सकाळी ८.३० वाजता राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रविवारी सकाळी पालकमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील, जि. प. चे आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, शल्यचिकित्सक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. संदीप पाटील, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, अधिसेविका प्रणिता गायकवाड हे उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रास्तविकात, पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची माहिती सांगत जिल्ह्यात कशा प्रकारे राबविली जाणार आहे ते सांगितले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दीपप्रज्वलन करीत मोहिमेचे उदघाटन केले. यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पहिला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यानंतर रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बालकाला लस पाजल्याची डाव्या हाताच्या करंगळीवर खूण करण्यात आली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक पालकाने पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ लस पाजून यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन देखील पालकमंत्री ना. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उमेंद्रा देशमुख यांनी तर आभार मनीषा पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका राधा चव्हाण, आशा पाटील, निर्मला सुरवाडे, जयश्री वानखेडे उपस्थित होते.

मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी अधिपरिचारिक रोहित देसाई, परिचारिका जयश्री शिंपी, शिवानी परदेशी, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी परिश्रम घेतले.