⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

GST Update : घ्या आता महागाई तुमच्या ताटापर्यंत पोहोचली, या वस्तूंच्या किमती वाढणार

जळगाव लाईव्ह न्यूज । GST Update । इतरवेळी तुमच्या दारा पर्यंत पोहोचलेली महागाई आता तुमच्या ताटा पर्यंत पोहोचली आहे. कारण येत्या १८ जुलैपासून दही, लस्सीसह इतर जीवनावश्यक वस्तू महागणार आहेत. जीएसटीच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दर वाढणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

पनीर, लस्सी, ताक, पॅकेज्ड दही, गव्हाचे पीठ, इतर तृणधान्ये, मध, पापड, अन्नधान्य, मांस आणि मासे (फ्रोझन वगळता), मुरमुरे आणि गूळ यासारखी प्री-पॅकेज असलेली कृषी उत्पादने १८ जुलैपासून महाग होतील.अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. यामुळे आता सर्वसामान्य जनतेची चांगलीच हेळसांड होणार आहे.येत्या काळात टेट्रा पॅक दही, लस्सी आणि ताक महाग होईल. कारण त्यावर १८ जुलैपासून ५% जीएसटी लागू होईल.ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर्स इत्यादींवर आधी १२ टक्के जीएसटी लागू होता, आता 18 टक्के जीएसटी लागू होईल. एल ई डी दिव्यांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.रूग्णालयात रु. पाच हजार(नॉन-ICU) भाड्याने घेतलेल्या खोल्यांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. दररोज हजारपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल.

याच बरोबर काही वस्तू स्वस्त देखील होणार आहेत. १८ जुलैपासून रोपवेवरून प्रवासी आणि वस्तूंची ने-आण करणे स्वस्त होणार आहे. कारण त्यावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्सेसवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.इंधनाच्या किमतीतून मालवाहतूक करणाऱ्या ऑपरेटर्सच्या भाड्यावर जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला जाईल. संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या काही वस्तूंवर IGST लागू होणार नाही.