⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खाद्यतेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार बनवतेय रणनीती ; अर्थमंत्री सीतारामन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । सध्या वाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य होरपळून निघत आहे. मागील गेल्या काही महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. वाढत्या खाद्यतेलामुळे सर्वसामान्य किचन बजेट कोलमडले आहे. दरम्यान, वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. भारत खाद्यतेलाचा मोठा भाग आयात करतो.

सीतारामन म्हणाल्या, “सर्वांना माहित आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तेल आयात करताना अनेक अडचणी येतात. आपल्याला माहित आहे की आपण खाद्यतेल आयात करू शकत नाही. आम्ही तिथून सूर्यफूल तेल घेत होतो.” सरकार आता इतर अनेक बाजारातून खाद्यतेल आयात करत आहे आणि नवीन बाजारपेठांकडेही लक्ष देत आहे.

अर्थमंत्र्यांच्या मते, युक्रेन-रशिया संघर्षामुळे निर्यातीसाठी त्या बाजारपेठांमध्ये उद्योगपतींनाही संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी युक्रेन आणि रशिया काही बाजारपेठांमध्ये निर्यात करत होते. आता त्यांची निर्यात होत नाही. त्या देशांमध्ये निर्यात करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्याची संधी उद्योगपतींनी पाहिली पाहिजे. केंद्र सरकार त्यांच्या पाठिंब्यासाठी सदैव तत्पर आहे.

इंडोनेशियाने निर्यातीवर बंदी घातली आहे

तर दुसरीकडे इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. त्याच वेळी, क्रूड सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले गेले आहे. खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा इंडोनेशियाचा निर्णय आणि इतर कारणांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत.