जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२६ । मध्यपूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या वणव्यात भारताला वेगवेगळ्या क्षेत्रात होरपळ सहन करावी लागत असताना दुसरीकडे मात्र मौल्यवान धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या २४ तासात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव सराफ बाजारात शनिवारी चांदीच्या भावात तब्बल ९ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी २ लाख ३१ हजार रुपयांवर आली. सोन्याच्याही भावात ४ हजार २०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख ४४ हजार ३०० रुपयांवर आले. गेल्या १० दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण सुरू आहे.

११ मार्च रोजी ४ हजार रुपयांची घसरण होऊन १ लाख ६१ हजार रुपयांवर आलेल्या सोन्याच्या भावात १० दिवसांत २० हजार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. २० रोजी ५०० रुपयांनी भाव कमी झालेल्या सोन्याचे भाव २१ रोजी तर थेट ४ हजार ७०० रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने १ लाख ४४ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले. सततच्या घसरणीमुळे सोन्याचे भाव दोन महिन्यांच्या नीचांकीवर आले आहे. यापूर्वी १८ जानेवारी रोजी सोने १ लाख ४० हजार ६०० रुपयांवर होते.
दुसरीकडे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. १९ मार्च रोजी २२ हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर २० रोजी ७ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी २ लाख ४० हजार रुपयांवर पोहोचली होती. २१ रोजी त्यात ९ हजार रुपयांची घसरण झाली व चांदी २ लाख ३१ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. चांदीचेही भाव तीन महिन्यांच्या नीचांकीवर आले आहेत. यापूर्वी २६ डिसेंबर २०२५ रोजी चांदी २ लाख ३२ हजार ५०० रुपयांवर होती. त्यानंतर भाववाढ होत जाऊन दोन्हीही मौल्यवान धातूंनी नवनवीन उच्चांक गाठले.











