जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । गेल्या दोन आठवड्यांपासून भावात घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी उसळी दिसून आली. आज सोने दरात तब्बल २,४६० रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दरात ३००० रुपयांची वाढ झाली. या दरवाढीने लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे

गेल्या काही महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीच्या भावात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर उच्चांकीपासून घसरल्याने लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यापाठोपाठ चांदी दरात उसळी दिसून आली. सोमवारनंतर आज मंगळवारी दोन्ही धातूंचे दर वधारले आहे.

आज ११ नोव्हेंबर रोजी सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,४६० रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२६,२८० रूपये मोजावे लागतील. २४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१५,७५० रूपये मोजावे लागतील. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,८४० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला ९४,७१० रूपये मोजावे लागतील.
सोन्याच्या दरासह चांदीच्या भावानंही उसळी घेतली आहे. १ किलो चांदीच्या दरात ३००० रूपयांची वाढ झाली आहे. यांनतर आता १ किलो चांदीसाठी तुम्हाला १,६०,००० रूपये मोजावे लागतील.
दरवाढीचे कारण काय?
दरम्यान, भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वधारून ८८.७१ रुपयांवर 3 पोहचल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे व्यावसायिक यांनी सांगितले.









