जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२५ । सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून मात्र अशातच सोन्यासह चांदीत मोठी दरवाढ झाली. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठा फेरबदल झाला असून शुक्रवारी चांदीत ६००० रूपयांपेक्षा अधिकची वाढ झाली. तर मागच्या चार दिवसात चांदी प्रति किलो १२,३६० रूपयांनी महागली. यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७८ हजार रूपयांवर जाऊन पोहोचली.

अलीकडच्या काळात सोन्याच्या तुलनेत किंमतीने स्वस्त मानली जाणारी चांदी अचानक भाव खाऊ लागली आहे. जळगाव शहरात दिवाळीच्या काळात चांदीने जीएसटीसह सुमारे एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला होता. मात्र दिवाळीनंतर दरात बरीच घसरण झाली होती. मात्र आता लग्नसराईचे दिवस सुरु असताना चांदी दरात सातत्यानं वाढ दिसून येत असून उच्चांकाकडे झेप घेतली आहे.

चांदी २४ नोव्हेंबरपर्यंत तीन टक्के जीएसटीसह एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत होती. त्यानंतर सातत्याने दरवाढ सुरू राहिल्याने २८ तारखेला सायंकाळपर्यंत चांदी १२,३६० रूपयांनी वधारून एक लाख ७२ हजार रूपयांपर्यंत पोहोचली होती. रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत आणखी ६१८० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने एक लाख ७८ हजार १९० रूपयांपर्यंत झेप घेतली. चारच दिवसांत चांदीत तब्बल १८,५४० रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. चांदीच्या दरातील आताची घोडदौड लक्षात घेता ती लवकरच नवा उच्चांक करेल, अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोने ही महागले?
चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही वाढ सुरूच आहे. सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १,२७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर १,३१,०१६ रुपये इतका आहे.












