लग्नसराईत मोठी चिंता; युद्धाच्या वणव्याने जळगावमध्ये सोन्याच्या दरवाढीचा भडका

मार्च 1, 2026 9:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२६ । सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. सोन्याचे दर घसरण्याची अपेक्षा ग्राहकांना असताना इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने मोठी उसळी घेतली. गेल्या २४ तासात तीन वेळा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे.

gold

सोन्याच्या दरात ९ हजार रुपयांची वाढ

जळगाव सराफ बाजारात गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात एकूण ९ हजार रुपयांची वाढ झाली. शनिवारी सकाळी बाजार उघडताच ६ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा १ हजार ५०० रुपयांनी दर वाढले. सायंकाळी साडेचार वाजता आणखी १ हजार रुपयांची भर पडली.दिवसअखेर जीएसटीसह प्रतितोळा सोन्याचा भाव १ लाख ७३ हजार ४० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

चांदीची वधारली
दुसरीकडे शुक्रवारी ७२१० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शनिवारी दिवसभरात आणखी तब्बल २३ हजार ६९० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख तीन हजार ८५० रुपयांपर्यंत वधारले.

युद्धजन्य परिस्थितीत शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये अनिश्चितता वाढते. अशा वेळी गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वळतो. जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने दर झपाट्याने वाढत आहेत. त्याचाच परिणाम जळगावसारख्या स्थानिक बाजारावरही दिसून येत आहे.मध्यपूर्वेतील संघर्ष किती काळ चालतो आणि त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय तोडगा निघतो, यावरच पुढील सोन्याच्या दरांचा कल ठरणार आहे. तोपर्यंत मात्र सोन्याच्या दरातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरेदीदारांची वाढती चिंता
सोन्याचा दर १ लाख ७३ हजारांच्या पातळीवर पोहोचल्याने लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सराफ व्यावसायिकांच्या मते, युद्धाची स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now