⁠ 
रविवार, मे 5, 2024

जळगावातील खुल्या जागांना मनपाचे नाव द्या, उपमहापौरांचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । शहरातील अनधिकृतरीत्या बेसमेंट प्रकरणासह इतर कामांबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी आढावा बैठक घेतली. यात शहरातील खुल्या जागांवर मनपाचे नाव लावण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले असून, नगररचना विभागाकडून अनधिकृत बेसमेंटप्रकरणी कार्यवाही करण्याबाबतच्या अहवालाची माहिती घेतली.

या बैठकीत नगररचना विभागाचे सहायक नगररचना संचालक अशोक करवंदे, अभियंता शकील शेख, जयंत शिरसाठ, प्रसाद पुराणिक, समीर बोरोले यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. गेल्या महिन्यात उपमहापौरांनी शहरातील अनधिकृत बेसमेंटप्रकरणी सर्वेक्षण करून, ज्या मार्केटमध्ये अनधिकृत वापर होत असेल अशा ठिकाणी थेट कारवाईचे आदेश उपमहापौरांनी दिले होते. त्यानंतर नगररचना विभागाने याप्रकरणी सर्वेक्षण करून ३० जणांचा अहवाल उपमहापौरांकडे सादर केला आहे. याप्रकरणी सुनावणी घेऊन पुढील कार्यवाहीचे आदेश उपमहापौरांनी दिले आहेत.

याप्रकरणी घेतला आढावा

मनपा खुल्या जागेतील बांधकामाबाबत निर्णय घेणे, मनपा मालकीच्या जागेतील शाळांची माहिती घेण्यात आली, तसेच मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम सर्व्हे करून कार्यवाही करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत. बांधकाम परवानगी तपासणी करणे व भोगवटा प्रमाणपत्रदेखील तपासणी करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत, तसेच आतापर्यंत बांधकाम परवानग्यांना देण्यात आलेली मंजुरी, निर्गमित केलेले प्रकरण व प्रलंबित प्रकरणांची माहितीदेखील उपमहापौरांनी या बैठकीत घेतली.

हे देखील वाचा :