⁠ 
सोमवार, मे 27, 2024

तापमानाच्या तडाख्यामुळे हतनूरमधील जलसाठा घटला ; 110 गावांमध्ये पाणी टंचाईची भीती..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । राज्यात तापमानाचा तडाखा वाढला असून यातच बहुतांश धारणांमधील जलसाठ्यात घट झाल्याने जलसंकट ओढवले आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातील देखील जलसाठा यंदा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५३.६० टक्के साठा होता. यंदा तो ४४.८६ टक्के आहे. मे हीटमुळे बाष्पीभवनाचा वेग अजून वाढून साठा कमी होईल. परिणामी हतनूरवर पाणीपुरवठा अवलंबून असलेली ११० गावे व प्रकल्पांना टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, धरणगाव आदींसह तब्बल ११० गावे व रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसी या प्रकल्पांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी ३ मे रोजी धरणात २६९.६० दलघमी म्हणजेच क्षमतेच्या ५३.६० टक्के साठा होता. तो यंदा ३ मे २०२४ रोजी २४५.४० दलघमी म्हणजे ४६.८६. टक्के इतका होता. गतवषपिक्षा साठा कमी, त्यातही तापमानात वाढीमुळे होणारे बाष्पीभवन अडचणीचे ठरत आहे. हतनूर धरणाचे तापी व पूर्णा नदीत तब्बल ४० किमीपर्यंत बॅकवॉटर आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने बॅकवॉटरची लांबी वाढत आहे. यामुळे उन्हाळ्यात धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते.

आठ विस्तारीत दरवाजे रखडले
धरणातून पावसाळी हंगामात पूर व्यवस्थापनासोबत गाळाचे सहज उत्सर्जन व्हावे, गावांमध्ये पाणी शिरु नये यासाठी १२ बाय ८ मीटरचे आठ विस्तारीत दरवाजांचे काम प्रस्तावित आहे. मात्र हे काम रखडले आहे.

हतनूरमध्ये गाळाचे प्रमाण वाढते असले तरी आजही धरण अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवते. धरणातील जलसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकेल इतका असल्याचं शाखा अभियंता यांनी सांगितलं आहे.