जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.गिरीश महाजन यांचे पहाटे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. ना. गिरीश महाजन यांचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असून त्याच कारणाने शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी निकटवर्तीय सुनील झंवर आणि इतर समर्थक उपस्थित होते. (Girish Mahajan was welcomed by Shiv Sena corporator)
जून महिन्याच्या शेवटी शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर तब्बल ३९ दिवसांनी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात जळगाव जिल्ह्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तर यासोबत शिंदे गटातर्फे माजी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील शपथ घेतली.
कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.गिरीश महाजन यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास महानगरी एक्सप्रेसने आगमन झाले. याप्रसंगी रेल्वे फलाटावर त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. प्रसंगी रेल्वे फलाटावर भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे स्थानकाहून आपल्या कार्यालयाकडे जातात गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय आहे. ना.महाजन यांच्यासोबत नितीन लढ्ढा आणि सुनील झंवर यांचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. कार्यालयाकडून जात असताना नितीन लढ्ढा व निकटवर्तीय सुनील झंवर यांनी ना.महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रसंगी इतर महाजन प्रेमी देखील उपस्थित होते.