⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गिरीश महाजन व जयकुमार रावल गटातील संघर्ष चिघळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । नाशिक महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर असतांना सभागृहनेते कमलेश बाेडके यांच्या नियुक्तीवरून माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री तथा प्रभारी असलेले जयकुमार रावल यांच्यातील शीतयुद्ध चिघळले आहे. आता हा वाद प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गटातील वाद वाढल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे तिन्ही आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच आता यापुढे रावल यांचाच उत्तर महाराष्ट्रासाठी शब्द अंतिम असेल, असा शब्द दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे गिरीश महाजन गटामध्ये मोठी खळबळ उडाली असून ते सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत.

२०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत महाजन यांनी एकहाती सत्ता मिळवून आणली  हाेती. मात्र, राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर नाशिकमध्ये पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. माजी पालकमंत्री महाजन यांचा एकेकाळी शब्द अंतिम होता परंतु गेल्या काही दिवसांत महाजन यांच्याकडील सूत्रे जळगावमधील काही प्रकरणामुळे रावल यांच्याकडे गेली असल्याचे चित्र आहे.