जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या जामनेरमधील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पोलिसांनी १५ पैकी १४ संशयित आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी जामनेर तालुक्यातील देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील जंगल परिसरात घडली. पीडित महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत तेथे बसली असताना आरोपी तेथे आले. त्यानंतर दोन आरोपींनी मित्रासमोरच महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर आरोपींनी संपूर्ण प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ चित्रीत केला.

या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा एका संशयिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर ही घटना समोर आली आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर फत्तेपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत.










